नागपूर: नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासाला आणि सामाजिक दायित्वाला गती देण्यासाठी मिहान इंडिया लिमिटेडतर्फे विविध संस्थांना सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी अंतर्गत मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. नागपूर येथील 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या धनादेशांचे वितरण करण्यात आले. या निधीच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि नागरी सुविधांच्या सक्षमीकरणाला मोठा हातभार लागणार आहे.

विविध सामाजिक उपक्रमांसाठी निधीचे वाटप

मिहान इंडिया लिमिटेडतर्फे मंजूर करण्यात आलेला CSR निधी नागपूर महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांना खालीलप्रमाणे वितरित करण्यात आला आहे:

  • सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंध मोहीम: तरुणी व महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका रोखण्यासाठी जिविका फाऊंडेशनला व्हॅक्सिनेशन ड्राईव्हकरिता ₹२५,००,००० चा धनादेश देण्यात आला.
  • सांडपाणी व्यवस्थापन: नागपूर शहराच्या भूमिगत गटार व ड्रेनेज व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेला ₹३५,००,००० चा निधी सुपूर्द करण्यात आला.
  • शैक्षणिक पायाभूत सुविधा: वूमन्स एज्युकेशन सोसायटी, नागपूर येथील महाविद्यालयीन इमारत आणि अत्याधुनिक सभागृहाच्या (ऑडिटोरियम) नूतनीकरणासाठी ₹३०,००,००० चा निधी देण्यात आला.
  • महिला सक्षमीकरण प्रकल्प: महिलांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेसाठी आणि कौशल्य विकासासाठी नागपूर महापालिकेला ₹३५,००,००० चे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.
  • पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण: नागपूर शहरात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि व्यापक वृक्षारोपण मोहिमेसाठी नागपूर महापालिकेला ₹१०,००,००० चा धनादेश देण्यात आला.

स्थानिक लोकप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाप्रसंगी नागपूरच्या महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वाखरे, महापालिकेतील सत्तापक्ष गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सामाजिक विकासाच्या कामांमध्ये कॉर्पोरेट संस्थांच्या सहभागामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.