विशाखापट्टनम: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. टाऊन कोठारोड परिसरातील 'लिटल गार्डन प्रायव्हेट स्कूल'मध्ये गृहपाठ (होमवर्क) पूर्ण न केल्याच्या कारणावरून महिला शिक्षिकेने कानशिलात लगावल्यानंतर अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. प्रणय तेज असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो शाळेत शिकत होता. या संपूर्ण घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय समोर आले?

वर्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, शिक्षिका मुलांचा गृहपाठ तपासत असताना प्रणय तिच्यासमोर उभा असलेला दिसतो. गृहपाठ पूर्ण नसल्याचे पाहून शिक्षिका त्याला ओरडते, ज्यावर मुलगा हात जोडून रडत मारू नका अशी विनवणी करताना दिसतो. मात्र, शिक्षिकेने त्याचे कपडे नीट करत त्याला कानशिलात लगावली. त्यानंतर काही सेकंदांतच मुलगा चक्कर येऊन थेट शिक्षिकेच्या मांडीवर कोसळला. शिक्षिकेने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कोणतीही हालचाल करत नव्हता. त्याला तातडीने केजी रुग्णालयात (King George Hospital) नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

पालकांचा गंभीर आरोप आणि रुग्णालयाबाहेर आंदोलन

प्रणयच्या कुटुंबीयांनी शाळेवर मोठा निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर शाळेकडून त्यांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, तर नातेवाईकांकडून त्यांना ही बातमी समजली. शिक्षिकेच्या मारहाणीमुळे आणि भीतीमुळे मुलाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाईकांनी केजी रुग्णालयाबाहेर जोरदार निदर्शने केली आणि शिक्षिका व शाळा प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी केली.

गुन्हा दाखल, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा

विशाखापट्टनम वन-टाऊन पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अंतर्गत संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास हाती घेतला आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अंदाजानुसार, भीती आणि पॅनिकमुळे मुलाला कार्डिॲक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच (Post-Mortem Report) स्पष्ट होईल. आंध्र प्रदेशचे शिक्षण व मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेवर तीव्र शोक व्यक्त करत दोषींवर आणि शाळा व्यवस्थापनावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.